Rajanand More
केरळच्या पहिल्या महिला IPS अधिकारी आर श्रीलेखा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत.
श्रीलेखा या केरळच्या पहिल्या महिला DGP म्हणून सेवेतून निवृत्त झाल्या आहेत. त्याआधी त्यांनी पोलिस दलात अनेक महत्वाच्या पदांवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
एक डॅशिंग महिला पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या सेवेबद्दल त्यांना २०१३ मध्ये राष्ट्रपती पोलिस पदकही मिळाले आहे.
सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी मागीलवर्षीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तेव्हापासून त्या राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. त्यांना या वर्षाच्या सुरूवातीला पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आले आहे.
तिरूवनंतपुरम महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांची ही पहिलीच निवडणूक असणार आहे.
श्रीलेखा यांचा राज्यात आदरपूर्वक दरारा आहे. त्याच प्रतिमेचा फायदा घेण्याची रणनीती भाजपने आखली आहे. केरळच्या राजधानीत सत्ताधाऱ्यांच्या पराभवासाठी भाजप प्रयत्नशील आहे.
श्रीलेखा यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर विजयाची खात्री व्यक्त केली आहे. मी याच शहरात जन्मले आणि मोठी झाले. त्यामुळे संपूर्ण शहर चांगल्याप्रकारे माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले.
अद्याप अधिकृतपणे महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली नाही. पण त्याआधीच भाजपने श्रीलेखा यांची उमेदवारी जाहीर करत आघाडी घेतली आहे.