Rashmi Mane
बीएसएफमध्ये नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे.
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) कडून हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) या पदांसाठी काढण्यात आलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज, 23 सप्टेंबर 2025 ला संपणार आहे.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट bsf.gov.in वर जाऊन तात्काळ अर्ज करावा.
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 1121 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये 910 पदे रेडिओ ऑपरेटर आणि 211 पदे रेडिओ मेकॅनिक यासाठी राखीव आहेत.
रेडिओ ऑपरेटरसाठी (RO): उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयांसह किमान 60% गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
रेडिओ मेकॅनिकसाठी (RM): उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित आयटीआय प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे असावे. त्यासोबतच PET चाचणीत पुरुष: 1.6 किमी धावणे (6 मिनिटे 30 सेकंदात), 11 फूट लांब उडी, 3.5 फूट उंच उडी. आणि महिला: 800 मीटर धावणे (4 मिनिटांत), 9 फूट लांब उडी, 3 फूट उंच उडी मारणे PET चाचणीत अपेक्षित आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25,500 रुपये ते 81,100 रुपये इतका पगार मिळणार आहे.
उमेदवारांना प्रथम शारीरिक मापदंड (PST) व शारीरिक चाचणी (PET), त्यानंतर लिखित परीक्षा, कागदपत्रांची तपासणी आणि शेवटी वैद्यकीय तपासणी द्यावी लागणार आहे.