Rajanand More
मद्रास हायकोर्टाने नुकताच २०१६ मधील विधानसभा निवडणुकीचा निकाल फिरविला आहे. या निकालाची सध्या देशभर चर्चा होत आहे.
तमिळनाडूतील राधापूरम मतदारसंघातून डीएमके उमेदवार एम. अप्पावू यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. तर त्यावेळी विजयी झालेले एआयडीएमकेचे उमेदवार आय. एस. एनबादुराई यांचा विजय रद्द करण्यात आला.
अप्पावू यांच्यासाठी हायकोर्टाचा निकाल महत्वाचा ठरला आहे. या निकालामुळे त्यांच्या नावावर एकाच मतदारसंघातून पाचवेळा निवडून येण्याची नोंद झाली आहे.
अप्पावू यांनी राधापूरम मतदारसंघाचे १९९६ पासून चारवेळा नेतृत्व केले होते. आता निकालानंतर त्यात एकाने भर पडली आहे. आधी १९९६, २००१, २००६, २०२१ आणि आता २०१६ मध्येही त्यांची आमदार म्हणून कागदोपत्री नोंद होईल.
२०१६ च्या निवडणुकीतील पराभवानंतर डीएमकेने पुन्हा त्याच मतदारसंघातून अप्पावू यांना उमेदवारी दिली. २०२१ मध्ये ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
विजयानंतर अप्पावू यांना थेट विधानसभा अध्यक्षपद देण्यात आले. पाच वर्षे ते या पदावर होते. राज्यातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.
२०२६ च्या निवडणुकीत अप्पावू यांना पराभवाचा धक्का बसला. मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला.
या पराभवानंतर काही दिवसांतच अप्पावू यांना २०१६ च्या निवडणुकीतील विजयाची बातमी मिळाली. पण केवळ कागदोपत्रीच त्याचा फायदा होईल. प्रत्यक्ष मतदारसंघात त्यांना आमदार म्हणून मिरविता येणार नाही.