Jagdish Patil
नांदणी येथील जैन मठातील माधुरी हत्तीला अंबानींच्या वनतारा प्रकल्पात नेल्यापासून कोल्हापूरसह राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
माधुरीला परत आणायचंच असा निर्धार करत कोल्हापुरकर रस्त्यावर उतरले असून त्यांनी नांदणी ते कोल्हापूर असा 45 किलोमीटरची पदयात्रा काढली आहे.
ही पदयात्रा रविवारी पहाटे पाच वाजता नांदणी येथून सुरू झाली असून ती संध्याकाळी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचणार आहे.
या पदयात्रेत 'हत्ती नाही भावनांची लेक आहे माधुरी' असा टी शर्ट घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सहभागी झालेत.
रॅलीमध्ये एका ट्रक्टरमध्ये माधुरीचा पुतळा ठेवल्याचं दिसत आहे. तर अनेकांच्या हातात विविध मजकूर लिहिलेले पोस्टर्स आहेत.
याच मोर्चातील एका व्यक्तीने लिहिलंय, "माझ्याकडे कुत्रे गाई म्हशी व बैल आहेत अंबानी हे तुम्ही वनतारात घेऊन जाणार का?"
तर आणखी एका तरूणाने "ज्याला ज्या भाषेत कळतंय त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावं प्रयोग बघायचा असेल त्यांना कोल्हापुरात यावं", असं लिहलं आहे.
तर एका फोटोत छत्रपती शिवाजी महाराज माधुरीला घाबरू नकोस महाराष्ट्र नक्कीच तुला तुझ्या घरी आणेल, असं म्हणत असल्याचं दाखवलं आहे.
तसंच या मोर्चात सहभागी झालेल्यांच्या डोक्यावर पांढऱ्या टोप्या आहेत ज्यावर 'माधुरी परत करा', असं लिहिलं आहे.