Rashmi Mane
गेल्या एक महिन्यापासून सूरू असलेल्या निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. आता वेध लागले आहेत ते मतदानाचे.
निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली होती.
त्यामुळे गेल्या अख्खा महिना राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली होती. सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारासाठी मैदानात उतरून जोरदार प्रचार केला.
रॅली, सभा, घोंगडी बैठका, कोपरा सभा, बाइक रॅली, घरोघरी भेटी आदींमुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले होते. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करत आहे.
भाजप आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय दिग्गज नेते मंडळींनी महाराष्ट्रात येऊन उमेदवारांचा प्रचार केला.
निवडणूक प्रचाराची सांगता आज संध्याकाळी 6 वाजता होणार असून उमेदवारांसह मतदारांना देखील मतदानाच्या दिवसांची प्रतीक्षा लागली आहे.
महिनाभरापासून राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या रूपाने धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार असून 20 तारखेला एकाच टप्यात महाराष्ट्रात मतदान पार पडणार आहे.
महिन्याभरात झालेल्या सभांमुळे निवडणुकीचं वातावरण बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय नेतेमंडळींकडून 20 तारखेला मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.