Rajanand More
विधानसभा निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार म्हणून पराग शाह यांचे नाव पुढे आहेत. ते भाजपचे विद्यमान आमदारही आहेत.
शाह यांच्या संपत्तीत मागील पाच वर्षांत तब्बल 575 टक्क्यांनी वाढ झाली आहे. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती 3383.06 कोटी रुपये असल्याचे नमूद केले आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शाह यांची संपत्ती 55.62 कोटी रुपये होती. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीवेळी त्यांनी आपली संपत्ती 690 कोटी एवढी नमूद केली होती.
शाह एक रियल इस्टेट डेव्हलपर असून त्यांचे प्रकल्प गुजरात आणि चेन्नई आदी राज्यांमध्ये आहेत. पत्नी मानसी यांच्याकडेही कोट्यवधींची संपत्ती आहे.
पराग शाह आणि त्यांच्या पत्नीकडे जवळपास तीन कोटी रुपयांची रोकड आहे. तर शाह यांनी 77 लाख 83 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. पत्नीच्या नावे 8.65 कोटींची गुंतवणूक आहे.
शाह यांच्या नावावर एकही गाडी नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या डोक्यावर 43.29 कोटींचे तर पत्नीच्या नावे 10.85 कोटींचे कर्ज आहे.
शाह हे जैन आणि गुजराती समाजामध्ये लोकप्रिय नेते आहेत. मतदारसंघात त्यांचा दांडगा लोकसंपर्क असल्याने भाजपने त्यांना सलग दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे.
मागील निवडणुकीत प्रकाश मेहता यांच्याऐवजी शाह यांना उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी मेहतांना तिकीट मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, पुन्हा शाह यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला.