Ganesh Sonawane
राज्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना प्रस्तावित आहे. या योजनेतून ५ वर्षात तब्बल १ लाख रिक्षांचे वाटप केलं जाणार असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
या योजनेचे नाव 'अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त रिक्षा सन्मान योजना' असे आहे. योजनेचा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे.
९ फेब्रुवारी २०२७ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून योजना सुरू करण्याचे नियोजन आहे. मात्र, मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच अंमलबजावणीचा मार्ग स्पष्ट होईल.
पहिल्या वर्षात २० हजार पात्र शेतकऱ्यांना रिक्षा देण्याचे उद्दिष्ट आहे. शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या ३१० तालुक्यांसह भविष्यात वाढणाऱ्या तालुक्यांचाही योजनेत समावेश असेल.
प्रत्येक तालुक्यात सरासरी ६० शेतकऱ्यांना रिक्षा देण्याचे नियोजन आहे. एखाद्या तालुक्यात पात्र लाभार्थी कमी असल्यास उर्वरित रिक्षा त्याच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांना दिल्या जातील.
या योजनेत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. म्हाडाच्या घरांच्या सोडतीप्रमाणे लॉटरी पद्धतीने पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
रिक्षा खरेदीसाठी लाभार्थ्यांना ९० टक्के कर्ज आणि १० टक्के अनुदान देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच रिक्षाधारकांना आरटीओ शुल्कातूनही सूट देण्याचा विचार आहे.
या योजनेतून मिळालेली रिक्षा शेतकऱ्यांना स्वतःच्या जिल्ह्यात चालवता येणार आहे. रिक्षा-टॅक्सी चालक महामंडळाच्या माध्यमातून योजना राबवण्याचे नियोजन असून, मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर पुढील तपशील स्पष्ट होतील.