Deepak Kulkarni
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची पदभार स्विकारल्यानंतर राज्यात आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे.
नव्या वर्षांत राज्य सरकारकडून एकदा दोनदा नव्हे तर पाचपेक्षा अधिकवेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. त्यात 35 हून अधिक अधिकारी बदलले आहेत.
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांची सोलापूर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून गेल्या आठवड्यात बदली करण्यात आली होती.
त्यामुळे धाराशिव जिल्हाधिकारीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेले होते.
धाराशिव धाराशिवचे नवे जिल्हाधिकारी म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कीर्ती किरण पुजार हे 2017 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
त्यांनी 2017 मध्ये 115 वी रँक मिळवली होती. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी तीन वर्षे काम केले आहे.
राज्य सरकारने कीर्ती किरण पुजार यांची मंगळवारी धाराशिवचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
त्यांना तात्काळ जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. उद्या किंवा परवा ते धाराशिवचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होऊ शकतात. तरुण चेहरा असलेले कीर्ती किरण पुजार हे त्यांच्या धडाकेबाज निर्णय आणि अभिनव उपक्रमांसाठी ओळखले जातात.