Aslam Shanedivan
सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भ विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, कापूस, तूर आणि भात पिकांचे मोठे नुकसान झाले.
अतिवृष्टीमुळे तब्बल 68 लाख 13 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर 83 लाखांहून अधिक शेतकरी प्रभावित झाले आहेत.
राज्य सरकारने मदत म्हणून 3,258 कोटी रुपये मंजूर केले असून अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांसाठी 480 कोटी 37 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत
याच दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने देखील मदतीचा हात दिला असून राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत ₹1566.40 कोटींची मदत मंजूर केली आहे.
अशातच आता राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये नुकसानाचे पंचनामे झाले असून याचा अहवाल महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागांनी 17 दिवसांत पूर्ण केले आहेत.
अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांपैकी वर्धा, यवतमाळ, अमरावती, अहिल्यानगर (अहमदनगर), धुळे आणि नाशिक या सहा जिल्ह्यांमध्ये सरकारने मदतीचे निकष जाहीर करण्यापूर्वीच पंचनामे पूर्ण केले होते.
या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य सरकारने विशेष बाब म्हणून दोन हेक्टरची मर्यादा वाढवून तीन हेक्टर केली आहे.
या निर्णयामुळे या सहा जिल्ह्यांतील सुमारे 7 लाख हेक्टर क्षेत्र अतिरिक्त नुकसानग्रस्त क्षेत्रात समाविष्ट झाले आहे. त्यामुळे नुकसानाची एकूण आकडेवारी 68 लाख 13 हजार 242 हेक्टर झाली आहे.