Rashmi Mane
महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा खुलासा समोर आला आहे.
महिला व बालविकास राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेतून तब्बल 26 लाख 34 हजार महिलांना विविध कारणांनी अपात्र ठरवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या महिलांनी महिन्याकाठी 1500 रुपये या प्रमाणे लाभ घेतला असून, त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे.
हे अपात्र लाभार्थी महिलांनी शासनाने ठरवलेल्या अटी व निकषांचे पालन न करता लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या महिलांकडून लाभाची रक्कम वसूल केली जाणार का, यावर चर्चा सुरू झाली आहे.
अद्याप शासनाने यासंदर्भात अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे राज्यभरात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान, अजून एक धक्कादायक बाब म्हणजे या योजनेचा गैरफायदा तब्बल 14,298 पुरुषांनीही घेतल्याचं उघड झालं आहे.
पुरुषांनी जवळपास 10 महिने योजना सुरू असताना दरमहा 1500 रुपये लाभ घेतल्यामुळे सुमारे 27 कोटी रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.
आता अपात्र महिलांवर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.