सरकारनामा ब्यूरो
आजपासून नागपुरात फडणवीस सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. राज्यात कडाक्याची थंडी सुरु असताना राजकारण मात्र तापलं आहे.
विधानसभेच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनानंतर आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.
हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यामागे एक खास कारण आहे. कोणतं आहे ते कारण जाणून घेऊयात...
नागपूर हे तब्बल 102 वर्ष म्हणजेच 1854 ते 1956 कालावधीपासून ब्रिटिश प्रांताची राजधानी होते. 1953 च्या मध्ये केंद्र सरकारच्या जस्टिज फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली या देशातील पहिले राज्य पुन:रचना आयोग प्रस्थापित केला गेला.
सी.पी अँड बेरारची राजधानी नागपूर होती. 1956 मध्ये फजल अली आयोगाचा अहवाल आला त्या अहवालानुसार विदर्भ आणि विदर्भातील आठ जिल्ह्यांना सी.पी अँड बेरार मधून वेगळे करण्यात आले होते.
नागपूरच्या विधानसभेत 10 ऑक्टोबर 1956 रोजी राज्यपालांचा असा संदेश होता की आज पासून विधानसभा बरखास्त करण्यात आली आहे. यामुळे 1953 च्या करारनुसार नागपूरला राजधानीचा दर्जा गमवावा लागला.
राजधानीचा दर्जा गमावल्याचं दु:ख होऊ नये म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या अधिवेशनाचे एक अधिवेशन वर्षातून एकदा तरी नागपूरात घेण्यात यावे अशी तरतूद 1953 च्या करारात करण्यात आली.
1960 च्या पहिले हिवाळी अधिवेशन हे नागपूरात झाले होते. दर वर्षी नागपूर येथेच भरवले जाते.