Deepak Kulkarni
सगळीकडे शाळा सुरू झाल्यानं उत्साहाचं वातावरण आहे. पण आजही कित्येक विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्यासाठी विविध साधनांंचा वापर करताना अनेक अडथळे पार करावे लागतात.
शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी बस हा नेहमीच एक महत्त्वाचा पर्याय असतो.
कित्येक विद्यार्थ्यांना एसटी बसच्या मासिक,त्रैमासिक आणि वार्षिक पाससाठी रांगेत ताटकळत उभंं राहावं लागतं. अनेकदा सतत दोन तीन दिवस हा त्रास सहन करावा लागतो.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता शाळा,महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
आता विद्यार्थ्यांना एसटीचे पास शाळेतच मिळणार आहेत.
विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी एसटी डेपोत जाण्याची गरज नाही.
नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 16 जून 2025 पासून याची अंमलबजावणी होणार आहे.
एसटी महामंडळानं 'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' ही मोहीम सुरू केली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर" योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत एसटी बस पास दिला जातो.
विद्यार्थ्यांना एसटी कर्मचारी शाळेत जाऊन पास देणार आहे. यासाठी शाळांना विद्यार्थ्यांची यादी एसटी प्रशासनाला देण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.