Rashmi Mane
यंदाच्या पावसाळ्यात समुद्रकिनारी फिरायला किंवा वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल, तर आधी हा नियम जाणून घ्या. प्रशासनाने सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय लागू केला आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सागरी मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. कोकण किनारपट्टीवरील मालवण बंदर क्षेत्रात २६ मे २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ दरम्यान सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि वॉटर स्पोर्ट्स पूर्णपणे बंद राहणार आहेत.
या बंदीमुळे सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाणारी प्रवासी बोट सेवा तात्पुरती बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांना किल्ला पाहण्यासाठी समुद्री मार्गाचा वापर करता येणार नाही.
मालवण, तारकर्ली आणि देवबाग परिसरातील स्कूबा डायव्हिंग, बोटिंग आणि इतर साहसी जलक्रीडा पूर्णपणे बंद राहतील. पर्यटकांना मान्सून संपेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. उंच लाटा, जोरदार वारे आणि अचानक बदलणारे हवामान यामुळे समुद्रातील प्रवास धोकादायक ठरू शकतो. अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.
मालवण बंदर विभागाने ३१ पर्यटन संस्था, बोट चालक आणि जलपर्यटन संघटनांना अधिकृत सूचना पाठवल्या आहेत. सर्वांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
‘इनलँड व्हेसल्स ॲक्ट, १९१७’ अंतर्गत नोंदणीकृत सर्व बोटी आणि जहाजांना मान्सून काळात व्यावसायिक सेवा थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते.
३१ ऑगस्टनंतर हवामानाचा आढावा घेऊन जलवाहतूक आणि वॉटर स्पोर्ट्स पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.