Rashmi Mane
संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत संविधानावर चर्चा करण्यात आली.
या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे.
या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत. आज नागपूर येथील संविधान चौक ते विधानभवनपर्यंत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार आंदोलन केले.
नागपूर येथील संविधान चौक इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालून, अभिवादन करून महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमकपणे आंदोलनाला सुरुवात केली.
हातात बाबासाहेबांचे फोटो घेऊन व घोषणा देत सर्व आमदारांनी संविधान चौकापासून पायी विधानभवनात प्रवेश केला.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर येत “बाबासाहेब का ये अपमान नही सहेगा हिंदुस्थान”, “जय भीम, जय भीमच्या” जोरदार घोषणा महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या.
बाबासाहेबांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान आहे. ह्या अपमानामुळे तमाम संविधानप्रेमी दुखावले आहेत. केंद्रीय गृहमंत्री महोदयांना ह्या अपमानाची माफी मागावीच लागेल! जय भीम! जय संविधान! अशी पोस्ट आदित्य ठाकरेंनी केली आहे.
ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी देशाला संविधान दिलं, ज्या बाबासाहेबांमुळे हे संसदेत बसले आहेत त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबडेकरांबद्दल हा द्वेष पाहा.
एस्क अकाउंटवरून पोस्ट
आंबेडकरांचं नाव घेणं ही ह्या देशात देशाच्या गृहमंत्र्यांना फॅशन वाटत असेल तर ह्यांनी संविधानाच्या अधिकाराने ज्या पदावर बसलेत त्या संविधानाचाच हा अपमान आहे. अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एस्क अकाउंटवरून करण्यात आली आहे.