Deepak Kulkarni
दिवाळीच्या मुहूर्तावर महावितरणने वीज ग्राहकांना मोठा दिलासा देण्यासाठी अभय योजना जाहीर केली आहे.
महावितरणच्या थकीत वीजबिलांचा प्रश्न या योजनेमुळे मार्गी लावण्याची संधी मिळणार आहे.
या योजनेसाठी नुकतीच सुरू झाली असून त्यासंबंधीचे नियम, अटी तसेच लाभ ग्राहकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
महावितरणच्या योजनेत कृषी ग्राहक आणि सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजना वगळता घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर बिगरकृषी ग्राहकांना सहभागी होता येणार आहे.
ज्या ग्राहकांची वीजबिलांची थकबाकी वाढल्यामुळे वीजपुरवठा कायमस्वरूपी किंवा तात्पुरता खंडित करण्यात आला त्यांना एक संधी देण्यासाठी महावितरणने अभय योजनेची घोषणा केली आहे.
अभय योजनेअंतर्गत थकीत वीजबिलावरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार 100% माफ होणार आहे. तसेच मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास 20% पर्यंत ज्यादाची सवलतही मिळण्याची शक्यता आहे.
तसेच ग्राहकांना ऑनलाइन अर्ज, हप्त्यांची सोय आणि पुनर्जोडणी शुल्कमाफ यांसारखे विविध फायदे मिळणार आहे.
राज्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या 34 लाख 86 हजार ग्राहकांकडे सुमारे 7,650 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती महावितरणच्या आकडेवारीनुसार समोर येत आहे.