Rajanand More
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच एडीसी मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी काही दिवसांपूर्वीच सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी अचानक राजीनामा का दिला याबाबत जोरदार चर्चा होती.
संब्याल हे १२ वर्षे सैन्यदलात होते. २०१४ मध्ये एनडीएमध्ये दाखल झाल्यानंतर ते सैन्याशी जोडले गेले होते. त्यांनी ४ पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये सेवा केली आहे. या सेवेत त्यांच्या कामगिरीचे कौतुकही झाले होते.
कारकीर्दीतील सर्वात महत्वाची नियुक्ती म्हणजे राष्ट्रपतींचे एडीसी ही होती. २०२३ मध्ये त्यांच्यावर ही जबाबदारी आली होती. एड-डी-कॅम्प हे पद अत्यंत महत्वाचे मानले जाते.
एडीसी म्हणजे केवळ राष्ट्रपतींसोबत राहणे, एवढाची जबाबदारी नसते. तर प्रोटोकॉल, कार्यक्रमांमधील सुरक्षा आणि राष्ट्रपतींच्या व्यस्त कार्यक्रमांशी संबंधित जबाबदाऱ्याही त्यांच्यावर असतात.
संब्याल यांचे राष्ट्रपतींसोबतचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. अत्यंत शांतपणे राष्ट्रपतींच्या सुरक्षेवर, त्यांना काय हवे नको, यावर नजर असलेल्या संब्याल यांची नेटिझन्समध्ये सतत चर्चा असायची.
संब्याल हे सोशल मीडियात नॅशनल क्रश बनले होते. अनेकजण त्यांचा नॅशनल क्रश म्हणून उल्लेख करायचे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यामागची कारणे शोधली जात होती.
मेजर संब्याल यांनी निवृत्तीबाबत खुलासा केला आहे. सैन्याची वर्दी कधी सोडावी लागेल याची कधी कल्पनाही केली नव्हती. मात्र, आयुष्यात कधीकधी अनपेक्षित वळणे येतात. त्याने आयुष्य कायमचे बदलून जाते, असे संब्याल यांनी सोशल मीडियातील व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
निवृत्तीच्या निर्णयामागे वैयक्तिक तसेच कौटुंबिक कारणे असल्याचेही संब्याल यांनी स्पष्ट केले आहे. देशातील काही प्रतिष्ठेच्या लष्करी नियुक्त्यांपैकी एका पदावर असतानाही संब्याल यांनी अचानक राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले होते.