सरकारनामा ब्यूरो
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेवर छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतलाय. भुजबळांच्या या भूमिकेमुळे सरकारमध्ये सारं काही आलबेल नाही, असंच चित्र आहे.
जरांगे यांची सगेसोयरेबाबतची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. पण सरकारच्या या निर्णयावर मंत्री भुजबळ यांनी आक्षेप घेतला. तसेच ओबीसी नेत्यांची बैठकही बोलावली.
आता शिवसेनेच्या दोन आमदारांनी भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून थेट हकालपट्टी करा. कशाला लाड करता? याला आधी बाहेर काढा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.
शिंदेंचे आमदार संजय शिरसाट यांनीही भुजबळांवर टीका केली आहे. भुजबळांनी राजीनामा द्यावा, असा सल्ला शिरसाट यांनी दिला आहे.
काही लोकांना राजकारण करायचं असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे. सरकारमधील मंत्र्यांना सरकार चुकलंय हे सांगायचं असेल तर मंत्रिमंडळ बैठकीत बोललं पाहिजे, असं शिरसाट म्हणाले.
मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. त्यामुळे जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर शंका घेऊ नये. तशी शंका घेतली तर मुख्यमंत्री अडचणीत येतात. मुख्यमंत्री शपथ घेतली आहे. ते ती पूर्ण करणार, प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जरांगे यांनी वाट पहावी, असं शिरसाट बोलले.