Rashmi Mane
दोन कोटी मुंबईकरांचा कारभार पाहणाऱ्या महापौरपदासाठी भाजपने मराठमोळ्या नेत्या रितु तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी रितु तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत त्या ‘सर्वसाधारण प्रवर्ग – महिला’ या आरक्षित गटातून मैदानात उतरल्या आहेत.
घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक 132 मधून रितु तावडे दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. तावडे या अभ्यासू, स्पष्टवक्त्या आणि आक्रमक भूमिकेसाठी ओळखल्या जातात.
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी काम केलं आहे. पालिका शाळांची गुणवत्ता, सुविधा आणि प्रशासन सुधारण्यासाठी त्यांनी अनेक ठोस निर्णय आतापर्यंत घेतले आहेत.
मराठा समाजातील असलेल्या रितु तावडे यांचा मतदारसंघ गुजराती बहुल आहे. तरीही त्यांनी तिथे भक्कम पकड निर्माण करत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.
महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष आणि सध्या मुंबई महिला मोर्चा कार्यक्रम समितीच्या संयोजिका म्हणून त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं आहे.
पालिका शाळांतील मुलींच्या सुरक्षेसाठी पोक्सो कायद्याच्या अंमलबजावणीची त्यांनी ठाम मागणी केली. घाटकोपरमधील पाणीटंचाईविरोधात काढलेला ‘हंडा मोर्चा’ चांगलाच गाजला.
‘मराठा प्रतिष्ठा’ संस्थेच्या अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत. MAVIMच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार आणि स्वावलंबनाच्या संधी मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.