Deepak Kulkarni
राज्यात सततच्या जोरदार पावसामुळं अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती उद्भवली आहे. मराठवाड्यातील बीड,लातूर,हिंगोली, धाराशिव,सोलापूर या जिल्ह्यांत पावसाच्या तडाखा बसला आहे.
पावसामुळे शेती पिकांसह नागरिकांचं अतोनात नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. पण सरकारी मदतीआधी या पूरग्रस्तांसाठी राज्यातील प्रमुख देवस्थानांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याचे जाहीर केले.
मुंबईतील प्रसिध्द अशा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल 50 लाख रुपये दिले आहेत.
आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडून देखील पूरग्रस्तांसाठी 21 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
शिर्डीचे साईबाबा संस्थानदेखील पूरग्रस्तांसाठी धावून आले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतींसाठी एकूण 1 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तब्बल 1 कोटी 11 लाख रुपयांचा धनादेश 27 संप्टेंबर रोजी मुख्यमंत्री सहायता निधीकडे सोपवण्यात आला आहे.
मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने पूरग्रस्तांसाठी मोठी मदत जाहीर केली आहे. न्यासाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 10 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.