सरकारनामा ब्यूरो
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज (बुधवार) 77 दिवस झाले आहेत. याप्रकरणी आत्तापर्यत सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई सुरु आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात बुधवारी (ता.26) विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केली होती. या मागणीला अखेर यश मिळाले आहे.
निकम यांनी याआधी अनेक राज्य पातळीवरील आणि राष्ट्रीय पातळीवरील खटले लढवत पीडितांना न्याय मिळवून दिला आहे. जाणून घेऊयात त्यांनी आतापर्यत कोणत्या यशस्वी केसेस लढल्या आहेत.
1991 चे कल्याण रेल्वे स्टेशनजवळील बॉम्बस्फोट प्रकरण, तसेच 1993 ला घडलेला साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचे खटल्यात त्यांनी यशस्वीरित्या आरोपींना शिक्षा मिळवून दिली.
2003 ला गेट वे ऑफ इंडिया येथे झालेला बॉम्बस्फोट, 2008 मध्ये ताज आणि मुंबईतील इतर ठिकाणी घडवण्यात आलेले दहशतवादी हल्ल्याचा खटला देखील निकम यांनी लढत आरोपींना शिक्षा मिळवून दिली.
निकम यांच्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आतापर्यंत 628 गुन्हेगारांना जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत यश मिळवून दिले आहे.
37 गुन्हेगारांना त्यांनी फासावर लटकवले आहे. या यशस्वी कारकिर्दीमुळे मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीयांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय देण्यासाठी निकम यांचीच नियुक्ती व्हावी, अशी मागणी केली होती.
शक्ती मिल बलात्कार केस, प्रवीण महाजन खून खटला,अंजना गावित प्रकरण, कोपर्डी बलात्कार आणि हत्या केस, यासांरखे अनेक गाजलेले खटले त्यांनी यशस्वीरित्या लढवल्या आहेत.