Rashmi Mane
Facebook आणि Instagram वापरणाऱ्या किशोरवयीन युजर्ससाठी मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील Meta विरोधातील प्रकरणात झालेल्या करारामुळे सोशल मीडिया वापरावर कडक नियम लागू होऊ शकतात.
किशोरवयीन मुलांना सोशल मीडियावर जास्त वेळ ठेवण्यासाठी काही फीचर्स तयार करण्यात आल्याचा Meta वर आरोप करण्यात आला होता. अतिवापराचा मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असा दावा करण्यात आला.
या प्रकरणात Meta कडून अब्जावधी डॉलरची भरपाई होण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीने कोणतीही चूक किंवा कायदेशीर जबाबदारी स्वीकारलेली नाही.
18 वर्षांखालील युजर्ससाठी Facebook आणि Instagram वापरावर दररोज दोन तासांची डिफॉल्ट मर्यादा प्रस्तावित करण्यात आली आहे. मर्यादा बदलण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक असू शकते.
किशोरवयीन युजर्ससाठी रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालण्याची शक्यता आहे. यामुळे उशिरापर्यंतचा स्क्रीन टाइम कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे.
सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेदरम्यान नोटिफिकेशन म्यूट ठेवण्याची योजना आहे. सतत सोशल मीडिया वापरणाऱ्यांना मध्येच ब्रेक घेण्याचे रिमाइंडरही दिले जाऊ शकतात.
Meta च्या मते, केवळ Facebook आणि Instagram वर निर्बंध लावून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही मुलांच्या सुरक्षिततेसाठी नियमांची अपेक्षा आहे.
या कराराचा भारतात थेट कायदेशीर परिणाम होणार नाही. मात्र, मुलांची ऑनलाइन सुरक्षा, वय पडताळणी, पालकांचे नियंत्रण आणि स्क्रीन टाइमबाबत भविष्यात भारतातही अधिक कडक नियम लागू होण्याची शक्यता आहे.