Rashmi Mane
काही महिन्यांपूर्वी म्हाडाच्या कोकण मंडळाने मोठ्या प्रमाणात घरं आणि भूखंडांची लॉटरी जाहीर केली होती.
ठाणे आणि वसई भागातील विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत ५,३५४ घरे आणि कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीसाठी जाहीरात काढली होती. याला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
येत्या 11 ऑक्टोबरला ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लॉटरी काढली जाणार आहे.
कोकण मंडळाने लॉटरी कार्यक्रमाचे आयोजन ठाणे येथे केले असून, विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सायंकाळी 6 नंतर उपलब्ध होईल.
तसेच, विजेत्यांना अर्जासोबत नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर SMSद्वारे संदेश देखील पाठवला जाईल. अर्जदारांना फेसबुक आणि यूट्यूब पेजवर थेट लॉटरीचे प्रक्षेपण बघता येणार आहे
या लॉटरीतून म्हाडाला घरांसाठी अर्ज शुल्क आणि भूखंडासाठी जमा केलेल्या रकमेचा मोठा महसूल जमा झाला आहे.
घरांच्या आणि भूखंडांच्या अर्ज विक्रीतून म्हाडाला 8 कोटी रूपयांची कमाई झाली असून, शासनालाही जीएसटीद्वारे 1 कोटी 42 लाख रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे
यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांना गृहनिर्माण योजना लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.
लॉटरी विजेत्यांची यादी पाहण्यासाठी म्हाडा संकेतस्थळाला भेट द्या आणि आपल्या घराच्या स्वप्नाकडे एक पाऊल जवळ जा!