Rajanand More
तामिळनाडू सरकारमधील कॅबिनेट मंत्री आधव अर्जून यांचा १४ वर्षांचा संसार मोडला आहे. त्यांच्या पत्नी डेजी मार्टिन यांनी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सोशल मीडियातून जाहीर केले.
आधव अर्जून हे मुख्यमंत्री विजय यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. त्यांना १० मे रोजीच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते सार्वजनिक बांधकाम आणि क्रीडा विकास मंत्री आहेत. ते चेन्नईतील विल्लीवाक्कम मतदारसंघातून निवडून आलेत.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच त्यांचा घटस्फोट होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या घटस्फोटाला राजकारण कारणीभूत ठरले का, याबाबत तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.
डेजी या देशात लॉटरी किंग म्हणून ओळख असलेल्या सँटियागो मार्टिन यांच्या कन्या आहेत. आधव अर्जून यांच्या राजकारणातील एन्ट्री आधीच दोघांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगाही आहे.
डेजी या व्यावसायिक असून अराईज इन्व्हेट कंपनीच्या व्यवस्थापकी संचालक असल्याचे त्यांच्या लिंक्डईन प्रोपाईलमध्ये म्हटले आहे.
डेजी यांनी सोमवारी (ता. १६) इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमचा हा प्रवास प्रेम, समजूतदारपणा आणि बदलांनी भरलेला होता. आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांमधून आम्ही मित्र, जीवनसाथी आणि पालक म्हणून एकत्र प्रवास केला.
आम्ही दोघांनीही परस्पर संमतीने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे डेजी यांनी सांगितले आहे. आता स्वतंत्र मार्गाने पुढे जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
वेगळे होण्याचा निर्णय घेतला असला तरी मुलाच्या संगोपनाची जबाबदारी दोघेही एकत्रितपणे पार पाडणार असून त्याचा आनंद आणि उज्ज्वल भविष्याला सर्वोच्च प्राधान्य राहील, असेही डेजी यांनी सांगितले आहे.