Deepak Kulkarni
छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबादेत असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या वाद सुरू आहे.
काही हिंदुत्ववादी संघटना आणि व्यक्ती औरंगजेबाच्या कबरीला विरोध करत आहेत आणि ती हटवण्यासाठी आंदोलनं करत आहेत. तर काहीजण औरंगजेबाची कबर ऐतिहासिक स्थळ म्हणून जपण्याची मागणी करत आहेत.
औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी करण्याऐवजी छत्रपती संभाजी महाराज त्याच्यापेक्षा किती महान, धर्माभिमानी होते, हे दाखवण्याचा प्रयत्न जिथे औरंगजेबची कबर आहे, त्याच खुलताबादेत भव्य स्मारक उभारून केले जावे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची मागणी भाजपचे विधान परिषदेचे आमदार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असलेल्या संजय केणेकर यांनी केली आहे.
ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी 'जगावं कसं अन् मरावं कसं' हे जगाला दाखवून दिलं, तो आमचा राजा किती महान होता, हा इतिहास आजच्या पिढीला माहित झाला पाहिजे,असंही केणेकर यांनी ही मागणी करताना म्हटलं आहे.
जातीयवाद आणि धार्मिक कट्टरता कमालीची वाढली असून त्यातून राज्यात अनेक प्रश्न निर्माण होत असल्याची भूमिकाही केणेकर यांनी मांडली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाची मागणी केली असल्याचे केणेकर यांनी सांगितले.
गुलमंडीत नारळ विक्री करणारे केणेकर यांचा आमदार होण्यापर्यंतचा प्रवास रोमहर्षक आहे. भाजपचा मायक्रो ओबीसी चेहरा असलेले केणेकर शहराध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस यापदापर्यंत त्यांनी काम केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला विधान परिषदेवर संधी देत भाजपामध्ये काम करणाऱ्या छोट्यात छोट्या कार्यकर्त्याचीही दखल घेतली जाते, त्याचा सन्मान केला जातो हे दाखवून दिले.