सरकारनामा ब्युरो
महाराष्ट्रात ऑनलाईन बेटिंग आणि जुगार बंदीबाबत सुरू असलेल्या चर्चेत आमदार सत्यजीत तांबे यांनी एका मुलाखतीमद्ये धडाकेबाज वक्तव्य केलं होतं.
आयपीएलसह विविध क्रीडा स्पर्धांमध्ये बेटिंग अॅप्सवर बंदी घालण्याची मागणी होत असतानाच तांबे यांनी “बंदी घालून काही उपयोग नाही, बेटिंग आणि जुगार खुलं करावं, तुम्ही जेवढ्या गोष्टी बंद कराल या देशात तेवढ्या त्या जास्त छुप्या मार्गाने वाढणार आहे. असं मत व्यक्त केलं आहे.
तांबे म्हणाले, “तुम्ही जेवढ्या गोष्टी बंद कराल, त्या देशात तेवढ्या जास्त वाढतात. लोक लपूनछपून त्यात सहभागी होतात, ज्यामुळे पोलिस हप्तेखोरी, भ्रष्टाचार वाढतो. तरुण मुलं लपून बेटिंग करतायत, त्यामुळे अधिक नुकसान होतं.
त्यापेक्षा हे सर्व कायदेशीर करा. लोकांना सांगा काय चांगलं, काय वाईट. त्यातून सरकारलाही उत्पन्न मिळेल आणि समाजातली कुतूहलता संपेल.”
तांबे पुढे म्हणाले, “जगात जुगार, कॅसिनो खुले आहेत. मग आपण का मागे राहावं? लोकांना माहिती द्या हे चुकीचं आहे, नुकसान होईल.
पण दडपशाही करून उपयोग नाही. मुलांना जितकं सांगाल करू नका, तितकंच ते करतील. उलट लपून बेटिंगमुळे व्यसन, कर्जबाजारीपणा आणि गुन्हेगारी वाढते.”
“गुटखा, जुगार, डुप्लिकेट दारू, वाळू हे महाराष्ट्रात बंदी असलेले अवैध धंदे पोलिसांचं मोठं उत्पन्नाचं साधन आहे. यातून तरुण वर्ग अडकतो.
थोडे पैसे मिळवण्यासाठी ते या अवैध धंद्यात जातात आणि नंतर व्यसनाधीन होतात. त्यामुळे हे कायदेशीर करा, पारदर्शकता येईल, भ्रष्टाचार कमी होईल,” असे तांबे म्हणाले.
तांबे यांचं वक्तव्य ऐकून मिश्र प्रतिक्रिया दिसल्या. काही जण समर्थन करतात, तर काही विरोध करतात.