Rajanand More
भाजपच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेल्या सात जणांमध्ये आमदार शगुन परिहार यांचा समावेश आहे.
शगुन परिहार या जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांनी २०२४ मध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या.
शगुन या अवघ्या २९ व्या वर्षी आमदार झाल्या आहेत. त्या जम्मू-काश्मीर विधानसभेतील सर्वांत तरुण आमदार आहेत. भाजपचे राज्यातील युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
शगुन यांचे वडील भाजपमध्ये सक्रीय होते. २०१८ मध्ये दहशतवाद्यांनी वडील अजित परिहार आणि काका अनिल या दोघांची हत्या केली होती.
वडील आणि काकांची हत्या झाल्यानंतर शगुन यांनी शिक्षणात खंड पडू दिला नाही. त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली, त्यावेळी त्या पीएचडी पूर्ण करत होत्या.
एवढेच नाही तर राजकारणात येण्याआधी त्यांनी जम्मू-काश्मीर लोकसेवा आयोगाची तयारी सुरू केली होती. प्रशासनात येण्याची त्यांची इच्छा होती. अखेर आमदार बनत आता त्या थेट विधिमंडळात दाखल झाल्या आहेत.
नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते सज्जाद अहमद किचलू यांचा ५२१ मतांनी पराभव करत शगुन यांनी इतिहास घडविला. शगुन यांना २९ हजार ५३ मते मिळाली होती. पहिल्या निवडणुकीत मुस्लिम बहुल मतदारसंघात निवडून आल्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या.
भाजपने शगुन यांना थेट राष्ट्रीय स्तरावर संधी देत जम्मू आणि काश्मीरमधील एका तरूण महिला नेतृत्वावर संघटनेत मोठी जबाबदारी टाकल्याचा संदेश देशाला देण्याचा प्रयत्न केला आहे.