Rajanand More
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने विविध समाजघटकांसह राजकीय पक्षांतील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी रणनीती आखली आहे.
उत्तर प्रदेशातील अपनी जनता पार्टीचे अध्यक्ष व माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनीही नुकतीच काँग्रेस नेते राहुल गांधी व खासदार प्रियांका गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या लेकीबाबत चर्चांना उधाण आले आहे.
संघमित्रा मौर्य या स्वामी प्रसाद यांच्या कन्या असून सध्या भाजपमध्ये सक्रीय आहेत. त्या बदायूं लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर विजयी झाल्या होत्या.
संघमित्रा यांना २०२४ च्या निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारले. त्यानंतर त्या पक्षसंघटनेच्या पातळीवर फारशा सक्रीय दिसल्या नाहीत.
वडिलांनी राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर संघमित्रा यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्या समाजवादी पक्षातही प्रवेश करून विधानसभेचे तिकीट मिळवू शकतात, अशीही चर्चा आहे.
स्वामी प्रसाद मौर्य हे योगी सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, त्यांनी २०२२ मध्ये भाजपला रामराम ठोकत समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. मात्र, त्यांचा विधानसभेत पराभव झाला. त्यानंतर त्यांनी नवा पक्ष काढला.
वडिलांमुळे संघमित्रा यांच्या राजकारणाला खीळ बसल्याची चर्चा आहे. त्यांनी भाजप सोडल्यानेच संघमित्रा यांना तिकीट नाकारल्याचे त्यावेळी बोलले जात होते. त्यांना पक्षातही कुठले पद नाही.
संघमित्रा यांनी आपण सध्यातरी भाजपमध्ये असून काँग्रेस किंवा समाजवादी पक्षात प्रवेशाचा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, असे असले तरी त्या भाजपमध्ये सक्रीय नसल्याने पक्षांतराच्या चर्चांना वाढू लागल्या आहेत.