Deepak Kulkarni
महाराष्ट्र राज्यातील विविध नागरी सेवा आणि सरकारी पदांसाठी उमेदवारांची भरती आणि निवड करण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ची मोठी भूमिका आहे.
MPSC परीक्षा उत्तीर्ण करुन अधिकारी व्हावं, समाजासाठी काहीतरी करावं, लालदिव्याची गाडी मिळवावी असं प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं. मात्र हे स्वप्न साकार करण्यासाठी जिद्द, मेहनत आणि चिकाटीची गरज असते.
आपण केलेल्या संघर्षामुळे यश आपल्या पायाशी लोटांगण घालतं, आणि संपूर्ण जग आपल्या यशाचं कौतुक करतं.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत ग्रामीण भागातून आलेल्या या तीन सख्ख्या भावांनी थेट MPSC परीक्षेत मोठं यश मिळवत नवा आदर्श उभा केला आहे.
जिद्द,संयम,प्रामाणिकता,कठोर मेहनतीच्या जोरावर अहिल्यानगर जिल्ह्यातून श्रीगोंदा तालुक्यातील तीन भाऊ अधिकारी पदावर पोहोचले आहेत.
उखलगावच्या चंदन कुटुंबातील तीन सख्ख्या भावांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत प्रशासकीय सेवेत पाऊल टाकलं आहे. तीन भावांचं यश हे एमपीएससीच्या उमेदवारांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट-ब 2024 परीक्षेत यश मिळवत अजय चंदन यांची राज्य कर निरीक्षकपद मिळवलं आहे.
अजयचे दोन भाऊ अनुक्रमे दिलीप मालन चंदन गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक तर विजय मालन चंदन हे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत.
दिलीप चंदन यांच्यानंतर उखलगावमधील जवळपास 15 जणांनी MPSC परीक्षा उत्तीर्ण केल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली आहे.