Rashmi Mane
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) पर्यटकांसाठी एक आगळावेगळा उपक्रम घेऊन आले आहे.
या स्पर्धेद्वारे पर्यटकांना राज्यातील पर्यटन स्थळांचे छायाचित्रे पाठवण्याची संधी मिळणार आहे. या छायाचित्र स्पर्धेत विजेत्याला तब्बल 5 लाख रुपयांचे आकर्षक बक्षीस मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील किल्ले, निसर्गरम्य स्थळे, धार्मिक स्थळे किंवा साहसी पर्यटनस्थळांना भेट दिल्यावर टिपलेली छायाचित्रे एमटीडीसीकडे पाठवायची आहेत.
छायाचित्र ओरिजनल, उच्च दर्जाचे आणि कोणत्याही संपादनाशिवाय असावे. प्रत्येक सहभागी जास्तीत जास्त पाच फोटो पाठवू शकेल. फोटोमधून पर्यटनस्थळाचे वैशिष्ट्य स्पष्ट दिसणे आवश्यक आहे.
प्रवेशिका आल्यानंतर छायाचित्रांची छाननी तज्ज्ञ परीक्षक करतील. यामध्ये फोटोग्राफी तज्ज्ञ, पर्यटन क्षेत्रातील जाणकार तसेच नामांकित कलाकारांचा समावेश असेल.
छायाचित्रातील सर्जनशीलता, संदेश आणि पर्यटनस्थळाचे ठळक दर्शन या गोष्टींवरून विजेते ठरवले जातील.
या स्पर्धेत प्रथम विजेत्यास पाच लाख रुपये मिळतील. प्रथम उपविजेत्यास 1 लाख रुपये, तर द्वितीय उपविजेत्यास 75 हजार रुपये मिळणार आहेत.
त्याशिवाय पाच उत्स्फूर्त पारितोषिके प्रत्येकी 50 हजार रुपयांची असतील. एवढेच नव्हे तर दर महिन्याला निवडले जाणारे ‘फोटो ऑफ द मंथ’ विजेत्यांना एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये तीन दिवस व दोन रात्री मोफत राहण्याची संधी आणि सन्मानपत्र दिले जाईल.