Sampat Devgire
महाराष्ट्रातील वनजमिनींच्या हक्कासाठी किसान सभेच्या वतीने तब्बल 50 हजार आदिवासींनी मुंबईकडे लॉंग मार्च सुरू केला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधणे हा या मोर्चाचा मुख्य उद्देश आहे.
या लॉंग मार्चचा पहिला मोठा मुक्काम नाशिकच्या वेशीवर मसरूळ येथील रस्त्यालगतच्या मोकळ्या मैदानावर झाला. अंधारातही हजारो आदिवासी एकत्र थांबले होते.
मोर्चाचा तिसरा दिवस निर्णायक ठरला. आदिवासींचा लोंढा इगतपुरीतील जिंदाल कंपनी परिसरात पोहोचला. शिस्तबद्ध आणि शांततेत हा प्रवास सुरू आहे.
किसान सभेचे नेते प्रा. नवले यांनी मोर्चामागील भूमिका स्पष्ट केली. वनजमिनींचे पट्टे आणि पाणी प्रश्नावर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
माजी आमदार जे. पी. गावित या मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. राज्य सरकारने आतापर्यंत तीन वेळा आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने आदिवासींमध्ये नाराजी आहे.
मोर्चातील आदिवासी आणि नेते रस्त्यावरच भोजन करत आहेत. महिला रस्त्यालगत स्वयंपाक करत असून, सर्वजण आपले धान्य आणि किराणा सोबत घेऊन चालले आहेत.
आज मंत्रिमंडळाची बैठक होत असून, या पार्श्वभूमीवर मोर्चाच्या नेत्यांना मुंबईत चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. चर्चेतून तोडगा निघेल का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मुक्कामाच्या ठिकाणी आदिवासी आंदोलक पारंपारिक तारपा नृत्य सादर करत आहेत. संघर्षातही आपली संस्कृती जपणारा हा मोर्चा राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.