सरकारनामा ब्यूरो
वसई आणि नायगाव रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल ट्रेनच्या अपघातात या तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री 8.50 वाजता घडली.
रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम हे तीन कर्मचारी करत होते. त्यावेळी वसई रेल्वे स्थानकाच्या अर्धा किमी दूरवर ही दुर्दैवी घटना घडली.
चिफ सिग्नल इन्स्पेक्टर वासू मिश्रा (वय 56), टेक्निशिअन सोमनाथ उत्तम (वय 36), असिस्टंट सचिन वानखडे (वय 35) अशी मृत रेल्वे कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
नायगाव-वसई रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅक चेंज करण्याची पॉईंट मशिन फेल झाली होती. तिच्या तपासणीचे आणि दुरुस्तीचे काम ते करत होते.
रेल्वे अपघातात एकाचवेळी तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेने वसई विभागातील सर्व रेल्वे कर्मचारी आणि मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सोमनाथ उत्तम यांचा मृतदेह सोलापूरला त्यांची गावी नेण्यात आला. सचिन वानखडे यांचा मृतदेह नागपूरला तर, वासू मिश्रा यांचा मृतदेह वसई येथे नेण्यात आला.
हा अपघात कसा झाला. यात निष्काळजीपणा कुणाचा? याबाबात आता रेल्वे प्रशासन चौकशी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
रेल्वेच्या मार्गांची देखभाल करणारे कामगार आपल्या जीवावर उदार होऊन काम करतात. अनेक वेळा धक्का लागून कर्मचारी गंभीर जखमी होतात. काही वेळा जीवही जातो. मात्र याबाबत प्रशासनाने अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही.