Rajanand More
राज्य निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होईल.
आयोगाने कार्यक्रम जाहीर करताच महापालिकांच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिताही लागू झाली आहे. सर्व राजकीय पक्षांवर त्यामुळे अनेक बंधने येतात. प्रचार, खर्चावर नियंत्रण, आर्थिक बळाचा दुरूपयोग, वस्तूंचे वाटप आदींवर मर्यादा येतात.
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी आयोगाकडून करडी नजर ठेवण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिले आहेत.
निवडणुका विनाअडथळा पार पडाव्यात यासाठी संवेदनशील, नक्षलग्रस्त आदी भागांत कायदा व सुव्यवस्थेसाठी विशेष यंत्रणा कार्यरत केली जाणार आहे.
आर्थिक बळाचा दुरूपयोग टाकण्यासाठी, मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी देण्यात येणाऱ्या वस्तूंच्या, मद्य, पैसा आदींच्या वाटपावर अंकुशे ठेवला जाईल.
रोख रकमांच्या मोठ्या व्यवहारांवर सर्व संबंधित ठिकाणी उदा. विमानतळ, रेल्वे स्थानक, हॉटेल्स, फार्म हाऊस याठिकाणी करडी नजर ठेवण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
रोख पैशांच्या वाटपासह सर्व व्यवहार व हालचालींवर जसे तारण, वित्तीय, हवाला दलाल यांच्यावरही यंत्रणांचे लक्ष असणार आहे.
बँकांमार्फत होणाऱ्या मोठ्या व संशयास्पत आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.