Rajanand More
राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १५ जानेवारीला मतदान तर १६ तारखेला मतमोजणी होणार आहे.
निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदारयादी मतदानासाठी अंतिम धरली जाणार आहे. त्यानुसार या मतदारयाद्यांची प्रभागनिहाय विभागणी करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने महापालिकांमध्ये प्रत्येक मतदान केंद्रास जोडावयाच्या मतदारांची निश्चित केली आहे. त्यानुसार मतदान केंद्र सज्ज ठेवण्याचे आदेश निवडणूक यंत्रणांना दिले आहेत.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदान केंद्रात ११०० ते १२०० मतदार असतील, असे स्पष्ट निर्देश आयोगाने दिले आहेत.
मुंबई वगळता इतर महानगरपालिकांसाठी मतदान केंद्रनिहाय मतदारांची संख्या वेगळी असेल पाच, चार व तीन सदस्यांचा प्रभाग असलेल्या महापालिकांसाठी वेगळी संख्या असणार आहे.
मतदान केंद्रनिहाय मतदार संख्या पाच सदस्यसंख्येच्या प्रभाग असलेल्या महापालिकांमध्ये सर्वात कमी म्हणजे ७०० ते ८०० असेल.
चार सदस्यसंख्येचे प्रभाग असलेल्या महानगरपालिकांमध्ये एका मतदान केंद्रावर ८०० ते ९०० मतदार असतील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
तीन सदस्य संख्येच्या प्रभागात मतदारांची केंद्रनिहाय संख्या ९०० ते १००० एवढी निश्चित करण्यात आली आहे. मतदारांना मतदान केंद्रांवर वेळेत आणि कोणत्याही त्रासाशिवाय मतदान करता यावे, यासाठी ही संख्या निश्चित करण्यात आली आहे.