Vijaykumar Dudhale
भाषणाला वेळेवर आलेल्या नरेंद्र मोदींनी सभेसाठी दूरवरून येणाऱ्या जनतेची माफी मागितली. काही नेत्यांनी सभेला उशिरा येण्याची लोकांना सवय लावली आहे, असे सांगून त्यांनी उशिरा येणाऱ्या नेत्यांना कानपिचक्याही दिल्या.
नरेंद्र मोदी यांचा काठी, घोंगडं देऊन आणि पिवळा फेटा बांधून धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
माढ्यातील दुष्काळी भागातील पाणी देण्याची शपथ एका मोठ्या नेत्याने घेतली होती. त्यांनी मतदारसंघातील गावांना पाणी दिले नाही, त्यांनतर त्यांची माढ्यातून निवडणूक लढवण्याची हिंमत झाली नाही, त्यामुळे त्यांना आता शिक्षा देण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल मोदींनी पवारांवर नाव न घेता केला.
काँग्रेसचे पंतप्रधान आणि त्यांच्या नेत्यांनी 60 वर्षांत केवळ ‘गरिबी हटाव’च्या घोषणा दिल्या. मात्र, आम्ही दहा वर्षांत 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे, असा दावाही मोदींनी केला.
सिंचनाच्या जवळपास 100 योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या, त्यात 26 योजना एकट्या महाराष्ट्रातील होत्या. आमच्या दहा वर्षांच्या काळात आम्ही 36 योजना पूर्ण केल्या आहेत, असेही मोदी यांनी म्हटले आहे.
शरद पवार हे केंद्रात कृषिमंत्री असूनही साखर कारखान्यावरील 25 हजार कोटी रुपयांचा प्राप्तीकराचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. आमच्या सरकारने एका झटक्यात तो प्रश्न निकाली काढला, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
ज्या काँग्रेसकडे एकेकाळी 400 खासदार होते, तो काँग्रेस पक्ष आता लोकसभेच्या 300 जागाही लढवत नाही, अशी खिल्ली नरेंद्र मोदी यांनी उडवली.
काँग्रेसला राम मंदिराचा प्रश्न सोडवायचा नव्हता. त्यांना श्रीरामाबद्दल आस्था नाही, त्यामुळे त्यांनी राम मंदिराचा प्रश्न एवढे दिवस प्रलंबित ठेवल्याचा आरोपही नरेंद्र मोदी यांनी केला.
R