Ganesh Sonawane
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करताना 'शाही स्नान' हा शब्द न वापरता 'अमृत स्नान' हा शब्द वापरण्यात आला आहे.
पूर्वीपासून शाहीस्नान हाच शब्द प्रचलित आहे. परंतु आखाडा परिषदेने शाही शब्दाला विरोध करत कुंभमेळा पर्वण्यांना शाही ऐवजी अमृत स्नान असे संबोधले जावे असा ठराव केला.
त्यामुळे साहजिकच शाही या शब्दाला साधू-महंतांनी विरोध का केला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
'शाही' हा शब्द मुघल साम्राज्याशी संबधित असल्याने 'शाही स्नान' या शब्दाला विरोध झाला आहे.
'शाही' हा शब्द मुळात फारसी आहे तो संस्कृत नाही. मुघल काळात या शब्दाचा वापर वाढला. त्यामुळे शाही स्नान या परंपरेची सुरूवात आणि नावाचा उगम मुघल काळात झाला असे सांगितले जाते.
'शाही' या शब्दाचा अर्थ राजाशी संबंधित किंवा राजेशाही असा होतो. मुघल काळात, राजेशाही थाटात होणाऱ्या कोणत्याही गोष्टीला शाही म्हटले जात असे. कुंभमेळयातील आखाड्यांच्या स्नानाला शाही म्हणण्यामागे त्यांची राजेशाही शान आणि महत्व आहे.
'शाही' स्नान हे कुंभमेळयातील सर्वात महत्वाचे धार्मिक विधी मानले जाते. या दिवशी आखाड्यांचे साधू संत विशेष पध्दतीने गंगा नदीत स्नान करतात. लाखो भाविक या पवित्र स्नानाचे साक्षीदार होण्यासाठी जमतात.
परंतु कुंभमेळयाचे अमृत गोदावरीत पडले म्हणून 'अमृत स्नान' असे नाव आता निश्चित करण्यात आले आहे. प्रशासनानेही याची दखल घेत आता यापुढे कुंभपर्वण्यांना 'अमृत स्नान' असे संबोधित करण्याबाबत आखाडा परिषदेने सूचित केले आहे.