Ganesh Sonawane
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा आहे. त्या पार्श्वभूमीवर काही साधू-महंतांनी शस्त्र परवान्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केले आहेत.
प्राप्त अर्जांपैकी दोघांना शस्त्र परवान्याची मंजुरी देण्यात आली असून, दोन अर्ज चौकशीसाठी पाठविण्यात आले. तसेच, दोन अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
काही साधू-महंतांनी आखाड्यांची संपत्ती व सुरक्षेचे कारण देत शस्त्र परवान्याची मागणी केली आहे.
त्र्यंबकेश्वर येथील लवलेश प्रसाद पांडे आणि आवाहन आखाड्याचे अभिनव मिश्र यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
चांदवड येथील स्वामी जयदेवपुरी महाराज आणि त्र्यंबकेश्वर येथील श्री सिद्धेश्वरानंद सोमेश्वरानंद यांचे अर्ज पुढील चौकशीसाठी पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांच्याकडे पाठविण्यात आले
तर तरसाळी येथील महंत स्वामी ओमनंदपुरी आणि त्र्यंबकेश्वर येथील रामनाथ आर्य यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे त्र्यंबकेश्वर येथील कोशाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती यांनीमुळात साधूंना शस्त्र हवे तरी कशाला? असा सवाल उपस्थितीत केला आहे.
आखाडा परिषदेची मान्यता मिळाल्याशिवाय परवाना देऊ नये असे महंत शंकरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.
साधू-महंतांकडून शस्त्रांची मागणी झाल्यास सर्वसामान्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो असही शंकरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.