Ganesh Sonawane
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ, पंचवटी आणि कुशावर्त तलाव परिसरातील मद्यविक्रीवर निर्बंध घालण्याच्या हालचाली सुरू आहेत.
सिंहस्थासाठी रामतीर्थ आणि पंचवटी परिसरातील दोन ते तीन किलोमीटरच्या परिघात मद्यविक्रीवर निर्बंध आणण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे.
त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तलाव परिसरातील मद्यविक्रीबाबतही निर्बंधांचा विचार सुरू आहे. या भागातील दुकानांबाबतही प्रशासनाकडून अभिप्राय मागवण्यात आला आहे.
मद्यविक्रीची दुकाने किती अंतरापर्यंत बंद ठेवावीत आणि निर्बंध किती काळ लागू करावेत, याबाबत जिल्हा प्रशासनाने नाशिक महापालिका आणि त्र्यंबक नगरपालिकेकडे माहिती मागवली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या सिंहस्थ आढावा बैठकीत कुंभमेळ्याचे धार्मिक पावित्र्य, भाविकांची सुरक्षा, स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा झाली.
महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम १३९ च्या आधारे मद्यविक्रीवरील निर्बंधांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
मद्यविक्रीच्या दुकानांभोवती नेमका किती किलोमीटरचा परिसर निर्बंधांत येणार? आणि हे निर्बंध किती दिवस लागू राहणार? या दोन्ही बाबींवर प्रशासनाचा अभिप्राय महत्त्वाचा ठरणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिफारसी मिळाल्यानंतर शासनाकडून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. मद्यविक्रीवरील निर्बंधांचे नेमके स्वरूप अंतिम अधिसूचनेनंतर स्पष्ट होईल.
नाशिकचा चिवडा, येवल्याची पैठणी अन् बरंच काही! राष्ट्रपतींना काय-काय भेट दिलं?