Ganesh Sonawane
नाशिकमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचे अभेद्य सुरक्षाकवच असणार आहे.
शहरात गस्तीचे प्रमाण वाढविण्यात येणार असून गस्तीसाठी पोलिसांना 200 दुचाक्या मिळणार आहेत.
गोदाघाटावरील प्रत्येक घाटांवर दिवसपाळीसाठी एक व रात्रपाळीसाठी एक असे दोन पोलीस उपायुक्तांची नियुक्ती केली जाणार आहे.
याशिवाय साधुग्राम व शाहीमार्गासाठी स्वतंत्र उपायुक्त असतील. सुमारे ४० उपायुक्त विविध ठिकाणी जबाबदारी सांभाळतील.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त, वाहतूक, बॅरिकेडिंग, सीसीटीव्ही मॅपिंग, साधुग्राम, शाही मार्ग आणि गोदाघाट परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
गुन्हे प्रतिबंधक उपाययोजनांची जबाबदारी उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्याकडे तर मनुष्यबळ व वाहतूक नियोजनाची जबाबदारी उपायुक्त चंद्रकांत गवळी यांच्याकडे असेल.
घाट व वाहनतळ व्यवस्थापनाची जबाबदारी उपायुक्त मोनिका राऊत आणि किशोर मोरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
तसेच, शाही स्नानावेळी गोदावरी नदीपात्रात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसाठी प्रथमच आधुनिक ‘ड्रायसूट’ उपलब्ध करून दिले जाणार आहेत.