Deepak Kulkarni
राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला.
अजितदादांवर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शहा, यांच्यासह अनेक सर्वपक्षीय प्रमुख नेते उपस्थित होते.
अजित पवारांच्या धक्कादायक अपघाताची माहिती मिळताच पवार कुटुंबासह राज्यावर शोककळा पसरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांना मानणाऱ्या नागरिकांचा कालपासून बारामतीत मोठा जनसागर लोटला होता.
आता याचदरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं अजित पवारांच्या अस्थींच्या विसर्जनासाठी देशव्यापी कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा हे या देशव्यापी कलश यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. बारामतीत अस्थिकलश त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
अजितदादांच्या अस्थी या काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या अनेक प्रमुख तीर्थक्षेत्रं आणि पवित्र नद्यांमध्ये विसर्जन करून त्यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
वाराणसीचा मणिकर्णिका घाट, हरिद्वारची हर की पौडी, प्रयागराज संगम यांसह गया, झारखंड, पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, काश्मीर आदी राज्यांचा या यात्रेत समावेश आहे. ही यात्रा देशाच्या चारही दिशांना 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान 14 पेक्षा जास्त राज्यांतून प्रवास करणार आहे.