Jagdish Patil
नेपाळ राष्ट्र बँकेने (NRB) 100 रुपयांची नवीन नोट जारी केली आहे. या नोटेवर नेपाळचा सुधारित नकाशा छापला आहे.
ज्यामध्ये कालापाणी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा हा भाग नेपाळचा हिस्सा दाखवला आहे. त्यावर भारत सरकारने आक्षेप घेतलाय.
या नोटेवर माजी गर्व्हनर महाप्रसाद अधिकारी यांची सही असून नोट जारी करण्याची तारीख 2081 बीएस नमूद केलेय, जी मागील वर्ष 2024 दर्शवते.
तर मे 2020 मध्ये केपी शर्मा ओली सरकारने असाच एक राजकीय नकाशा जाहीर केला होता. ज्यामध्ये या 3 भागांना नेपाळच्या सीमेत दाखवलं होतं.
तेव्हाही भारताने नकाशाचा अशा प्रकारे विस्तार करणं स्वीकार केलं जाऊ शकत नाही, असं म्हणत तिन्ही क्षेत्रे आपली असल्याचा म्हटलं होतं.
दरम्यान, 'एनआरबी’च्या प्रवक्त्याने सांगितलं, जुन्या 100 रुपयांच्या नोटेवर नकाशाचा समावेश आहे आणि सरकारच्या निर्णयानुसार तो सुधारित करण्यात आला आहे.
नेपाळमध्ये 10, 50, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर नकाशा नसतो. केवळ 100 रुपयांच्या नोटेवर नेपाळचा नकाशा असतो, असेही त्याने सांगितलं.
नव्या नोटेच्या मध्ये हलका हिरव्या रंगाचा नेपाळचा नकाशा दिसत आहे. नकाशा जवळ अशोक स्तंभ आणि लुम्बिनी लिहीलेले आहे.
भारत-नेपाळमध्ये काली नदीच्या उगम आणि सीमेच्या व्याख्येमुळे वाद आहे. नदीचा उगम लिम्पियाधुरा येथे असल्याने हे प्रदेश नेपाळमध्ये येतात, असं त्यांचं म्हणणं आहे.
मात्र, कालापानीजवळ नदीचा उगम असल्यामुळे हे क्षेत्र उत्तराखंडमध्ये येते, असं भारताचे म्हणणे आहे. यावरूनच दोन्ही देशांत वाद आहे.