Rashmi Mane
बँक खातेदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने बँक खात्यांशी संबंधित नवा नियम जाहीर केला असून तो 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू होणार आहे.
या नियमांनुसार आता प्रत्येक बँक खातेदाराला तसेच लॉकरधारकाला चार नामनिर्देशित व्यक्ती (Nominees) ठेवण्याची परवानगी मिळणार आहे.
या निर्णयामुळे खातेदाराच्या निधनानंतर पैशाचा किंवा मालमत्तेचा दावा करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे.
वित्त मंत्रालयाने 23 ऑक्टोबर रोजी या संदर्भात माहिती दिली आहे. मंत्रालयाने सांगितले की, या नव्या नियमानंतर क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया अधिक सोपी आणि स्पष्ट होईल, ज्यामुळे ग्राहकांच्या कुटुंबीयांना किंवा वारसांना त्रास सहन करावा लागणार नाही.
ग्राहकांना प्रत्येक नॉमिनी व्यक्तीसाठी वेगळ्या टक्केवारीनुसार (एकूण 100%) हिस्सा ठरवण्याचा पर्याय उपलब्ध असेल. म्हणजेच, खातेदार इच्छेनुसार चारही नामनिर्देशितांना आपला हिस्सा वाटू शकेल.
बँक खात्यांमध्ये ‘नॉमिनी’ म्हणजे असा व्यक्ती ज्याला खातेदार आपल्या पैशाचा किंवा संपत्तीचा हक्क देतो. खातेदाराच्या निधनानंतर ही रक्कम कायदेशीर प्रक्रियेचा विलंब न होता थेट नामनिर्देशित व्यक्तीला मिळते.
नवीन बँक खाते उघडताना ग्राहकांना नॉमिनी व्यक्ती जोडता येईल. तर ज्यांचे खाते आधीपासून सुरू आहे, ते ग्राहक ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने नॉमिनी जोडू शकतील.
तसेच, जर खातेदाराला आपला नॉमिनी बदलायचा असेल किंवा त्याचे नाव काढून दुसऱ्याचे जोडायचे असेल, तर तेही निश्चित प्रक्रियेच्या माध्यमातून करता येणार आहे.