Ganesh Sonawane
गुजरातमध्ये आता घरच्यांना न सांगता किंवा गुपचुप (Love Marriage ) लग्न करण्याचा मार्ग कठीण होणार आहे.
गुजरातच्या विधानसभेत विवाह नोंदणीसंदर्भात नवीन नियमांची घोषणा करण्यात आली आहे.
या नवीन बदलांनुसार प्रत्येक विवाहापूर्वी आई-वडिलांना अनिवार्यपणे माहिती देणे बंधनकारक ठरणार आहे.
त्यामुळे पळून जाऊन किंवा कुटुंबीयांच्या नकळत लग्न करणाऱ्या जोडप्यांना लगाम बसणार आहे.
सरकारने विवाह नोंदणी कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला असून, हे नवीन नियम लागू झाल्यानंतर गुजरात राज्यातील विवाह नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया बदलणार आहे.
गुजरात सरकारने अधिकृतपणे गुजरात मॅरिज रजिस्ट्रेशन अॅक्टमधील नियम 44 मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
प्रस्तावित दुरुस्तीनुसार कोणत्याही विवाहाची नोंदणी करण्यापूर्वी संबंधित जोडप्याने आपल्या आई-वडिलांना लग्नाची माहिती दिली असल्याची नोंद करणे आवश्यक राहील.
तसेच आई-वडिलांची सविस्तर माहिती सादर करणे ही विवाह नोंदणी प्रक्रियेचा अनिवार्य भाग असेल.
विवाह नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या जोडप्याला एक औपचारिक घोषणापत्र सादर करावे लागेल. या घोषणेत त्यांनी आपल्या आई-वडिलांना विवाहाची माहिती दिली आहे की नाही, याचा स्पष्ट उल्लेख करावा लागेल.
सहाय्यक निबंधकाकडून या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केल्यानंतर सरकारकडून इलेक्ट्रॉनिक किंवा लेखी स्वरूपात संबंधित पालकांना अधिकृत सूचना पाठवली जाईल.
संपूर्ण विवाह नोंदणी प्रक्रिया पारंपरिक कागदी पद्धतीऐवजी राज्य सरकारच्या केंद्रीकृत ऑनलाइन पोर्टलवर स्थानांतरित केली जाणार आहे.
अर्जाची नोंद झाल्यानंतर तत्काळ प्रमाणपत्र देण्याऐवजी, अर्जाच्या तारखेपासून 30 दिवसांचा अनिवार्य वेटिंग पीरियड ठेवण्यात येणार आहे. या कालावधीनंतरच विवाह नोंदणी प्रमाणपत्र जारी केले जाईल.
हे बदल अंतिम करण्यापूर्वी नागरिकांकडून सूचना व हरकती मागवण्यासाठी सरकारने 30 दिवसांची मुदत दिली आहे.