Ganesh Sonawane
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारसा असलेल्या गडकिल्यांच्या संवर्धनाचा उपक्रम सुरु केला आहे.
‘महिन्यातील एक दिवस गडकिल्ल्यांसाठी’या उपक्रमांतर्गत महाविकास आघाडीचे नेते रविवारी (ता. २२) दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी येथील रामशेज किल्ल्यावर पोहोचले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दक्षिण अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, नाशिकचे खासदार राजाभाऊवाजे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी आपली वाहने थांबवून महाविकास आघाडीचे नेते पावसातच चालत किल्ल्याकडे निघाले. रामशेज किल्ल्यांवर पोहचले.
पाच ते सहा फुट उंच शंभरपेक्षा अधिक रोपांचे वृक्षारोपण गडावर करण्यात आले. तसेच सोलर दिवे, स्वागत कमान, स्वच्छता राखण्याचे सूचना फलक, कचराकुंडी, बसण्यासाठी बाकडे यावेळी व्यवस्थितरित्या ठेवण्यात आले.
किल्ला संवर्धनाच्या मोहिमेत गुंतले असताना अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसाने वातावरण भारून टाकले. अंगावर सरी झेलतच या सर्व मावळ्यांनी ही मोहीम राबवली.
छत्री वापरायचा प्रयत्न केला, पण वाऱ्याचा जोर एवढा होता की काही क्षणातच छत्र्या उलटून पडू लागल्या. त्यामुळे अखेरीस पावसाचा आनंद घेतच रामशेज किल्ल्याची ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.
या उपक्रमातून इतिहासाचे जतन होईल आणि मराठी माणसाला अभिमानाचे स्फूरण चढेल अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या कार्याचे कौतुक केले.