Ganesh Sonawane
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी NMMS परीक्षेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येणार आहे.
NMMS परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. दरमहा 1 हजार रुपये म्हणजेच वर्षाला 12 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत NMMS परीक्षा 20 डिसेंबर 2026 रोजी घेतली जाणार आहे. गुणवत्तेच्या आधारे पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाईल.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक आधार देणे हा योजनेचा उद्देश आहे.
22 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर विलंब शुल्कासह अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे.
विद्यार्थ्यांची नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया शाळेच्या लॉगिनमधून केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन आवेदनपत्रे उपलब्ध आहेत.
अर्ज भरताना जात आणि दिव्यांगत्व प्रमाणपत्राची माहिती अचूक देणे आवश्यक आहे. मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांचा फोटो तसेच स्वाक्षरी ऑनलाइन अपलोड करावी लागणार आहे.
प्रवेशपत्र उपलब्ध होण्यापूर्वी अर्जातील चुका शाळेच्या लॉगिनमधून दुरुस्त करता येतील. अर्ज भरताना माहिती आणि कागदपत्रांची पडताळणी काळजीपूर्वक करणे महत्त्वाचे आहे.