Rajanand More
बडोदा राजघराण्याच्या राजकुमारी पद्मजाराजे गायकवाड यांचा मंगळवारी २० वा वाढदिवस. त्या बडोद्याचे विद्यमान महाराज समरजितसिंह गायकवाड आणि महाराणी राधिकाराजे गायकवाड यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत.
आई महाराणी राधिकाराजे यांनी पद्मजाराजे यांचे बालपणापासून ते आतापर्यंतचे काही खास फोटो सोशल मीडियात शेअर केले करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राधिकाराजे यांनी म्हटले आहे की, लाडक्या पद्मजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. गोष्टी सांगणे, झोपवणे, खळखळून हसणे आणि कुत्र्याला फिरायला नेणे या सगळ्यात वेळ कसा निघून गेला कळलंच नाही.
पद्मजाराजे या शालेय जीवनापासूनच सामाजिक जीवनात सक्रीय आहेत. या माध्यमातून गरजू तसेच समाजातील विविध घटकांसाठी अनेक उपक्रम चालवितात.
या उपक्रमांतर्गत त्यांनी गरजू आणि वंचित घटकांतील लोकांसह विद्यार्थ्यांना चप्पल, बूट उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून त्यांनी हजारो पादत्राणांचे वाटप केले आहे.
महिलांच्या आरोग्यविषयीही त्या सजग आहेत. त्या महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यशाळा घेतात. 'श्री महाराणी चिमणाबाई स्त्री उद्योगालया'तील महिलांनी तयार केलेल्या कपड्यांचा 'पद्मजा' हा ब्रँड पुढे नेत आहेत.
LGBTQIA+ आणि अल्पसंख्याक समुदायाला पाठबळ देणाऱ्या 'गजरा' (Gazra) प्रकल्पाशी त्या जोडलेल्या आहेत. लुप्त होत चाललेल्या हस्तकलांना आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी 'ऊर्जा' (URJA) प्रदर्शनासारख्या उपक्रमांना त्यांचे पाठबळ आहे.
पद्मजाराजे यांचे वडोदरा येथील नवरचना स्कूल आणि ब्रिटनमधील शाळेतून शालेय शिक्षण झाले असून सध्या ब्रिटनमधील 'डरहम युनिव्हर्सिटी बिझनेस स्कूल'मध्ये उच्च शिक्षण घेत आहेत.