Deepak Kulkarni
अमेरिका-इराण-इस्त्रायल युद्धामुळे जागतिक पातळीवर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. संपूर्ण देशासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र इंधन तुटवडा जाणवत आहे.
इंधन तुटवड्याच्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या समस्येमुळे पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागत असून नागरिकांसह शेतकऱ्यांना याच्या झळा बसताना दिसून येत आहे.
मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.
आता जालना जिल्ह्यातील संभाव्य इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.
जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना पाच टक्के इंधन साठा राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहे.
जिल्हाधिकारी मित्तल यांनी कॅन-बॉटल आणि इतर बॅरलमध्ये पेट्रोल आणि डिझेल देऊ नका अशा स्पष्ट सूचना पेट्रोलपंप चालकांना दिल्या आहेत. त्यामुळे आता अशा लोकांना इंधन मिळणार नाही.
जिल्हाधिकाऱ्यांनी हा कठोर निर्णय काळ्या बाजारात पेट्रोल आणि डिझेलची होणारी विक्री थांबवण्याच्या हेतूने घेतला असल्याचं स्पष्ट केलं आहे.
आशिमा मित्तल यांनी याचसोबत काळ्या बाजारात इंधनाची विक्री आढळून आल्यास त्यावर कठोर कारवाई करण्याचाही इशाराही दिला आहे.
जालना जिल्हाधिकारी यांनी यावेळी जिल्ह्यातील नागरिकांना पेट्रोल-डिझेलचा काळजीपूर्वक वापर आणि शक्यतो प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे.