सरकारनामा ब्युरो
विधानसभेच्या उपाध्यक्षपदी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची निवड झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उपाध्यक्षांचे नेमके काय काम असते? बघूया...
विधानसभेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे प्रमुख अधिकारी असतात. विधानसभेतील आमदार बहुमताने विधानसभा अध्यक्षांची निवड करतात.
अध्यक्षांच्या अनुपस्थितीत त्यांचे सर्व अधिकार उपाध्यक्षांना मिळतात. त्यामुळे आधी विधानसभेच्या अध्यक्षांना कोणते अधिकार असतात हे समजून घेणे गरजेचे आहे.
विधानसभेचे कामकाज सुरळीत चालविण्यापासून संविधानातील तरतुदींचा अन्वयार्थ लावण्याची जबाबदारी अध्यक्षांवर असते.
विधानसभेतील अटी, शर्ती, नियम ठरविणे, एक दशांश आमदार उपस्थित नसतील तर सभागृहाचे कामकाज स्थगित वा तहकूब करणे ही जबाबदारी अध्यक्षांची असते.
विधानसभेच्या विविध समित्यांच्या अध्यक्षांच्या नेमणुका विधानसभेचे अध्यक्ष करतात, त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवतात.
एखादे विधेयक ‘अर्थविषयक विधेयक’ आहे अथवा नाही, हे ठरवण्याचा अधिकारही अध्यक्षांना असतो. हे अर्थ विधेयक विधानसभेतच संमत व्हावे लागते.
सगळयात महत्त्वाचा अधिकार आहे तो पक्षांतरबंदी विषयक तरतुदीचा. दहाव्या अनुसूचीनुसार आमदार पात्र आहेत की अपात्र हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांचा असतो.
मगाशी सांगितल्याप्रमाणे अध्यक्षांच्या अनुपस्थितीत त्यांचे सर्वाधिकार विधानसभा उपाध्यक्षांना मिळतात. त्यामुळे हे पद संवैधानिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे ठरते.
जर विधानसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले, त्यांनी राजीनामा दिला किंवा 14 दिवसांची नोटीस देऊन त्यांना पदमुक्त करण्याचा ठराव बहुमताने मंजूर झाला तर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे पद रिक्त होते.