Rashmi Mane
PM किसान सन्मान निधी योजना देशातील शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. मात्र, एकाच कुटुंबातील किती जणांना या योजनेचा लाभ मिळतो, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. नियम समजून घेतले नाहीत तर हप्ता अडकू शकतो.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 2-2 हजार रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा होते.
सरकारच्या नियमानुसार PM किसान योजनेत एक कुटुंब म्हणजे एक युनिट मानले जाते. पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले हे एकाच कुटुंबात धरले जातात. त्यामुळे साधारणपणे एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला लाभ मिळतो.
जर पती आणि पत्नी दोघांनी स्वतंत्र अर्ज केला असेल, तर तो नियमांच्या विरोधात मानला जाऊ शकतो. अशा प्रकरणांमध्ये सरकार अतिरिक्त मिळालेली रक्कम परत वसूल करू शकते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी नियम तपासणे महत्त्वाचे आहे.
जर घरातील प्रौढ मुलाच्या नावावर स्वतंत्र शेती असेल आणि त्याचे कुटुंब वेगळे मानले जात असेल, तर तो स्वतंत्र अर्ज करू शकतो. तसेच जमीन वाटप झाल्यास आणि नोंदी वेगळ्या असतील तर पात्रता स्वतंत्र ठरू शकते.
अनेक राज्यांमध्ये एकाच कुटुंबातील अनेकांनी लाभ घेतल्याची प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे आता e-KYC, आधार लिंकिंग आणि जमिनीच्या नोंदींची पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे फक्त पात्र शेतकऱ्यांनाच मदत मिळणार आहे.
आयकर भरणारे, काही सरकारी कर्मचारी, माजी संवैधानिक पदाधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील यांसारख्या व्यावसायिकांना PM किसान योजनेचा लाभ मिळत नाही. ही योजना मुख्यतः गरजू शेतकऱ्यांसाठी आहे.
अर्ज करण्यापूर्वी PM किसान पोर्टल किंवा स्थानिक कृषी विभागाकडून माहिती घेणे आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास पैसे परत करावे लागू शकतात आणि कारवाईही होऊ शकते.
PM किसान योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘New Farmer Registration’ पर्याय निवडून अर्ज करता येतो. तसेच CSC सेंटर किंवा कृषी विभाग कार्यालयातूनही नोंदणी करता येते.