Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेळघाटातील महिलांनी तयार केलेली आकर्षक शाल भेट देण्यात आली. या शालीमुळे विदर्भातील पारंपरिक कलाकुसर आता जागतिक स्तरावर चर्चेत आली आहे.
2 नोव्हेंबरला दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘भारत रिन्युएबल एनर्जी समिट 2026’ चे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही शाल मोदींना भेट दिली.
या शालीवर नैसर्गिक पानांचे ठसे उमटवून सुंदर कलाकुसर करण्यात आली आहे. पारंपरिक हस्तकला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम यात पाहायला मिळतो.
ही शाल मेळघाटातील महिलांनी तयार केली आहे. त्यांच्या कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळ प्रयत्नशील आहे.
अमरावती विकेंद्रित सौर चरखा क्लस्टरअंतर्गत महिलांना प्रशिक्षण दिले जाते. सौरऊर्जेवर चालणाऱ्या चरख्याच्या मदतीने सूतनिर्मिती केली जाते.
कस्तुरबा सोलर खादी महिला समितीच्या माध्यमातून महिलांना सूतनिर्मिती, हातमाग आणि कलात्मक प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जाते.
सौरऊर्जेच्या वापरामुळे सूतनिर्मिती अधिक पर्यावरणपूरक झाली आहे. या उपक्रमातून दुर्गम भागातील आदिवासी महिलांना रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळत आहे.
130 हून अधिक देश सहभागी झालेल्या या जागतिक परिषदेत मेळघाटच्या महिलांच्या कलेची दखल घेण्यात आली. पंतप्रधानांना भेट मिळालेली ही शाल अमरावतीसाठी अभिमानाची बाब ठरली आहे!