Deepak Kulkarni
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारात उतरले आहेत.
मोदींनी या प्रचारादरम्यान, अचानकपणे झारग्राममध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झालमुडी विक्रीच्या दुकानाला भेट दिली.
पश्चिम बंगालमध्ये झालमुडी हा एक प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. यात मुरमुरे, चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, शेंगदाणे, लिंबू आणि चाट मसाला यांनी झालमुडी बनवण्यात येते. झालमुडी म्हणजे भेळीचाच एकप्रकार आहे.
मोदींनी त्या झालमुडी अर्थात बंगाली भेळ विक्रेत्याशी दिलखुलास संवाद साधला. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पंतप्रधानांनी भेट दिल्यानंतर हा भेळ विकणारा दुकानदार एका रात्रीत स्टार झाला आहे.
हा भेळ विकणारा दुकानदार सध्या बंगालसह संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे त्याला एखाद्या सेलेब्रिटीसारखा मान दिला जात आहे.
संबंधित भेळ विक्रेत्याचं नाव विक्रम साओ असं असून त्यानं बनवलेली झालमुडी (स्वादिष्ट भेळ) पंतप्रधान मोदी यांना प्रचंड आवडल्याचं दिसून आलं. यावेळी मोदींनी त्या दुकानदाराची कौटुंबिक माहितीही घेतली.
पण या विक्रेत्याचा आता दुसरा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे. मूळ बिहारचा असलेल्या या दुकानदार साओनं आपण आयुष्यात एक मोठी चूक केल्याचं म्हटलं आहे.
झालमुडी विक्रेत्यानं पंतप्रधानांना बंगाली भेळ बनवून दिल्यानंतर मोदींनी त्याला १० रुपयेही दिले. अगोदर नको म्हटल्यानंतर नंतर त्याने ते स्वीकारले. पण त्यावर मोदींची ऑटोग्राफ (सही) घेण्यास विसरल्याचं त्यानं सांगितलं.
तसेच यावर झालमुडी दुकानदार म्हणतो, ही चूक आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. कारण भविष्यात परत कधी पंतप्रधान मोदींना एवढ्या जवळून भेटण्याची संधी मिळेल की नाही, हे सांगणं कठीण आहे.